छत्रपती संभाजीराजे जयंती विशेष :

Category : Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक स्वकीय आणि परकीय शत्रूंशी झुंजतच स्वराज्य स्थापन केले. स्वराज्याचा विस्तार सुरू असतानाच शिवाजीराजे व महाराणी सईबाई यांच्या पोटी १४ मे १६५७ ला किल्ले पुरंदरवर एक तेजस्वी पुत्र जन्मास आला. सखूबाई, राणूबाई आणि अंबिकाबाई या तीन मुलींच्या पाठीवर जन्मास आलेल्या या पुत्राचे नाव राजमाता जिजाऊंनी संभाजी ठेवले. लवकरच तो सर्वांचा लाडका शंभू बनला.

महाराणी सईबाई बाळंत व्याधीने त्रस्त झाल्याने कापूरओहळ गावच्या गाडे पाटील घराण्यातील धाराऊ संभाजीराजांच्या दूध-आई झाल्या. १६५९ ला सईबाईंच्या निधनाने अवघ्या तीन वर्षांचे संभाजीराजे मातृसुखाला पारखे झाले. परंतु जिजाऊ व शिवरायांनी त्यांच्या संगोपनाकडे जातीने लक्ष दिले. युद्धकलेसोबत अनेक शास्त्रे, भाषा व कलांचे शिक्षण दिले. बुद्धभूषण या संस्कृत ग्रंथासह संभाजीराजांनी नखशिख, नायिका-भेद आणि सातसतक या हिंदी भाषेतील ग्रंथांची निर्मिती केली. रणांगणावर नाते जोडणारा हा राजपुत्र साहित्याच्या क्षेत्रातही चमकला. आठव्या वर्षापासूनच शिवरायांनी आपल्या पुत्राला राजकारणाचा अनुभव घ्यायला सुरुवात केली.

१६६४ च्या पुरंदर तहात चतूर शिवरायांनी आपल्याऐवजी संभाजीराजांच्या नावाने मोगलांची मनसब स्वीकारली. पंच-हजारी मनसबदार असणारे संभाजीराजे १६६६ मध्ये शिवरायांसोबत आग्य्रास गेले. शेकडो मैलांचा प्रवास वयाच्या नवव्या वर्षी करणारा हा शिवपुत्र मोठा धाडसी होता. आैरंगजेबाच्या कैदेत असताना बाहेरून शिवरायांच्या राजकारणाला आकार देण्याचे काम शंभूराजांनी केले. आग्र्यातील शिवरायांचा पाच महिन्यांचा सहवास शंभूराजांना संयम, धाडस, चातुर्य व बुद्धिमत्ता देणारा ठरला. १२ सप्टेंबर १६६६ रोजी औरंगजेबाच्या हातावर तुरी देत शिवाजीराजे राजगडावर तर सुरक्षेच्या कारणास्तव शंभूराजे मथुरेत राहिले. तीन महिन्यांनंतर नोव्हेंबर १६६६ मध्ये शंभूराजे राजगडावर पोहोचले. औरंगजेबाच्या मुलाशी मैत्री करत स्वराज्य वाढीसाठी प्रयत्न केले. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांना स्वतंत्र लेखनिक मिळाल्याने २६ जानेवारी १६७१ पासून संभाजीराजे स्वतंत्रपणे कारभार पाहू लागले. परंतु वेळोवेळी त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान झाले.

मुघलांशी लढत व्यापाराला प्रोत्साहन
एकीकडे शंभूराजे मुघलांशी अनेक आघाड्यांवर लढत होते. तर दुसरीकडे व्यापाराला प्रोत्साहन देत होते. इंग्रज, डच, फ्रेंच यांना व्यापार वाढीसाठी सवलती देत, गुलामांची खरेदी-विक्रीची पद्धत लिलावात काढली. शेकडो पटीने ताकदवर असणाऱ्या औरंगजेबाला सलग आठ वर्षे झुलवणाऱ्याची दखल इतिहासाने घेतली नाही. १६८१ ते १६८९ या अल्प कारकीर्दीत शिवकाळातील सर्व गड किल्ल्यांचे रक्षण करीत, फोंड्याजवळ मर्दनगड नावाचा किल्ला उभारत साष्टी, पारसिक या ठिकाणी नवीन किल्ल्यांच्या बांधकामाचा प्रयत्न केला. रायगडापासून दूर असणाऱ्या तामीळ राज्यातल्या कावेरी नदीपात्रात त्वेषाने घोडा फिरवणारे, कर्नाटकचे राज्य दुप्पट करणारे, पोर्तुगीज व्हाॅइसरॉयला पळवून लावणारे, मोगल, आदिलशहा, इंग्रज यांना न घाबरणारे संभाजीराजे एकुलते एक होते.


Leave a Reply